मुख्य सामग्रीवर वगळा

मातृत्व, कृतत्वं, माणुसकी व उदार अंतःकरणाचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे आमची आत्या सौ. विजयालक्ष्मी आनंदराव भेदेकर' यांना द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन -किरण त्र्यंबक चावरे

तथागत बुद्धाच्या पवित्र बोधीवृक्षाप्रमाणे केवळ आपल्या 'भेदेकर' परिवारासच नव्हे तर 'चावरे परिवार', 'वाघमारे परिवार', 'शिराढोणकर परिवार', 'ढवळे परिवाराला' व तसेच प्रत्येकच नात्याला व नात्यातील प्रत्येक व्यक्तीला प्रेम, आपुलकी व माणुसकीची सावली देणारी व्यक्ती म्हणजे 'आमची आत्या' व सर्वांची आक्का आणि आई असणारी आमची सौ. विजयालक्ष्मी आनंदराव भेदेकर' जी सर्वार्थाने आम्हा सर्वांची 'आईच' होती. कारण नात्यातील प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांनी आईचीच भुमिका बजावली होती. सखं- चुलत असा भेदभाव त्यांनी कधीच केला नाही. कारण नाते हे चुलत असले तरी ते शेवटी रक्ताचेच असतात. असं आमच्या आत्याला मनोमन वाटायचं. 

म्हणून ती घरी आलेल्या प्रत्येक माणसाची आपरूक करायची. खरंतर सखं-चुलत असा भेद कोणीही करू नये. चुलत नातं असण्यात काहीच गैर नाही. आपल्याच सख्या नात्यातील एखाद्या व्यक्तीच्या परिवारात वाढ व विस्तार होत जातो तेव्हा ते पुढे चुलत नाते बनत जातात. पण त्यांचं रक्त हे एकच असतं. जसे एखाद्या झाडाच्या अनेक फांद्या असतात परंतु त्याचं मूळ हे एकच असतं. तसचं मानवी नात्यांचं असतं. म्हणून आमची आत्या नात्यातील प्रत्येक माणसाला जीव लावायची व आपुलकीने बोलायची. अशा या आमच्या करुणामय हृदय असलेल्या आईचं 14 एप्रिल 2021 ला निर्वाण (निधन) झालं. 

खरंतर तो दिवस होता आपल्या सर्वांचे उद्धारकर्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा. बाबासाहेबांची जयंती म्हणजे संपूर्ण बौद्धजंणासाठी एक मोठा सणच. केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात बाबासाहेबांचा हा जन्मोत्सव अगदी थाटामाटाने साजरा केला जातो. परंतु कोरोना महामारीने या बाबासाहेबांच्या जागतिक उत्सवावरही संकट आलं होतं. जगाच्या इतिहासात आतापर्यंत दोन वेळा या विश्वरत्नाची जयंती साजरी झाली नाही ती केवळ या कोरोनामुळेच. म्हणून हे संकट मानवजातीसहीतच महापुरुषांच्या जयंती व विविध सण-उत्सवावरही होतं. म्हणून जयंतीचा 14 एप्रिल हा दिवस आपल्यासाठी अशुभ ठरला असं म्हणणे यथोचित ठरणार नाही. 


कारण या महामारीने संपूर्ण मानवजातीसहीतच महापुरुषांच्या जयंत्या, विविध धर्मियांचे सण- उत्सव सर्वच गोष्टीवर निर्बंध आणले होते. म्हणून खरोखरच हा दिवस आपल्यासाठी अशुभ ठरला अशातली बाब नाही. कारण ते संकट जागतिक होतं. जिथे कुणाचच काहीच चाललं नाही. पैसा,धन, संपत्ती, आशीर्वाद, पाप, पुण्य, देव, ईश्वर, भगवान (जर असतील तर) यातील कोणत्याही शक्तीला त्या संकटावर मात करता आली नाही. तो दिवस आठवला की आजही अंगावर भयंकर शहारे येतात. कारण तेव्हा केवळ भारतावरच नव्हे तर संपूर्ण जगावर 'कोरोनाचं संकट होतं. त्याची आज कल्पनाही करावीशी वाटत नाही. कारण त्या महामारीने जगात लाखो लोक मृत्यूमुखी पडले. 

सुरवातीस त्या संकटाची चाहूल कुणालाच नव्हती व ते संकट पुढे एवढं मोठं अक्राळविक्राळ रूप धारण करेल अशी कुणाच्याही मनात पुसटशी कल्पनाही आली नाही. परंतु अचानकच त्या संकटाने संपूर्ण जगावर मृत्यूचे भयंकर रोद्र रूप धारण केलं. अन् त्यात लाखो-करोडों जीव कायमचे निघून गेले. मग त्यात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ज्यांना ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला ती ती माणसं यास बळी पडली. मग त्यात कुणाची आईच तर कुणाचे वडील, कुणाचे भाऊच तर कुणाच्या बहीणी, कुणाचे तरूण मुलं-मुली, कुणाचे आत्या, मामा, काका, मित्र हे सर्व रक्ताचे नातेवाईक ज्यांना आपण अगदी हक्काने "आपली माणसं" म्हणतो ती सर्व या महामारीने आपल्यापासून कायमची हिरावून घेतली. तो काळच इतका कठिण होता की त्याच्या भयानतेचं वर्णन शब्दात करणे शक्य नाही. 

आतापर्यंत जगात अनेक साथीचे रोग, आजार येऊन गेल्याचे आपण पुस्तकात वाचलं आहे व अनेकांकडून ऐकलं देखील आहे. परंतु त्या सर्वांच्या तुलनेत 'कोरोना' ही महामारी संपूर्ण जगावर भारी पडली याची जागतिक इतिहासात सर्वात 'क्रुर काळ' म्हणून नोंद झाली आहे. विशेष म्हणजे आज वैद्यकीय शास्त्र एवढं प्रगत झालेलं असताना सुद्धा या कोरोना महामारीला आटोक्यात आणणे कुणालाही शक्य झालं नाही. दिवसेंदिवस हजारों लाखो लोकं मृत्यूमुखी पडत होती. स्मशान भूमीमध्ये दिवसेंदिवस प्रेताचे ढीग खचाखच वाढत होती. प्रेतांचा अंत्यविधी करायलाही जागा अपुरी पडत होती. जिथे मिळेल तिथे लोक अंत्यविधी आटोपून आपल्या जीवलगास जड अंतःकरणाने कायमचा व अखेरचा निरोप देत होती. एवढी भीषण परिस्थिती होती. माणसाला मानवी जन्म मिळणे ही आपल्या संस्कृतीत फार मोठी गोष्ट मानली जाते. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस मरण येणे ही नैसर्गिक नियमाप्रमाणे अटळ अशी गोष्ट आहे. परंतु माणसांचा मृत्यू हा अपघाती व आकस्मिक नसावा असं प्रत्येकाला वाटत असतं.

 माणसानं त्याचं संपूर्ण आयुष्य जगल्यावर व जीवनाचा संपूर्ण सुखोपभोग घेतल्यावर त्यास त्याच्या वृद्धत्वात मृत्यू यावा व मृत्यू झाल्यावर त्या व्यक्तीचा शेवटचा जो अंत्यविधी असतो तो मोठ्या सन्मानाने व्हावा असं प्रत्येकाला वाटत असतं. अर्थातच त्यास स्नान घालून, नवी शुभ्र वस्त्र परिधान करून, अगरबत्ती, सुगंधीत फुले, आपापल्या धर्माप्रमाणे संस्कार, रितीरिवाज हे सर्व संस्कार त्यास मिळावे असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं.

परंतु या भीषण महामारीने हे सर्व संस्कार तर दूरच ठेवले परंतु आपल्या जवळच्या व्यक्तीला निर्वाण झालेल्या व्यक्तीचा अखेरचा चेहराही पाहु दिला नाही व शेवटचा स्पर्श देखील करू दिला नाही. कारण माणसाच्या स्पर्शानेच माणसं मरत होती. जगातल्या कुठल्याच स्मशानभूमीने मृत्यूचा व प्रेताचा असा भयंकर नजारा आजपर्यंतच्या इतिहासात पाहीला नसेल. उन्हाळ्यात जसा सुर्याच्या तीव्र उष्णतेमुळे जंगलात आपोआप वनवा पेट घेतो व सर्व जंगल जळायला लागतं तसं प्रत्येक स्मशानभूमीत चित्र निर्माण झालं होतं. एकीकडे अग्नीचा व धुराच्या लाटा उफाळत होत्या तर दुसरीकडे स्मशानभूमीत आपल्या माणसाला शेवटचा अतिशय दुःखद असा निरोप देण्यासाठी रडण्याचा टाहो फुटला जात होता व अश्रूंचा पूर वाहत होता व नियती सोबत माणूसही हतबल नजरेने तो पाहत होता. कारण हे सर्व मानवी शक्तीच्या बाहेर होतं. म्हणून त्याला नाईलाजाने आपल्या माणसांसाठी काहीच करता येत नव्हतं. इतकं ते मोठं संकट होतं.

हे संकट संपूर्ण जगासहीत आमच्या आत्याच्या (सर्वांची आक्का) रूपाने आमच्यावरही कोसळलं होतं. तो दिवस होता 14 एप्रिल 2021 चा. दरवर्षीप्रमाणे बाबासाहेबांच्या पुतळ्याला दुरूनच का असेना सकाळी सकाळी अभिवादन करायला जावे या बेतात मी असताना मला अचानक सकाळी 9:00 च्या दरम्यान समतानगर मधील आमच्या आत्याच्या घराशेजारी राहणारे दैनिक प्रजावाणीचे प्रतिनिधी राजु जोंधळे यांचा फोन आला अन् त्यांनी मला आमच्या आत्याच्या दुःखद निधनाची बातमी सांगितली. "किरण बबलुच्या आईचं निधन झालं" अशी बातमी ऐकल्याबरोबर थोड्या वेळासाठी पाया खालची जमीनच सरकल्यागत झालं. काय बोलावं सुचेनासे झालं होतं. सांगितलेल्या बातमीवर विश्वासच बसला नाही. मी राजुदादांना पुन्हा पुन्हा विचारलं की आपण खरंच सांगताय ना? जेव्हा त्यांनी बातमी खरीच आहे म्हणून सांगितलं तेव्हा इतका जबरदस्त शॉक बसला की तो मी शब्दात सांगू शकणार नाही. कारण तसा जीवच लावला होता मला आत्याने (आक्काने) म्हणून त्यांच्या निधनाची बातमी ही सर्वांप्रमाणेच माझ्यासाठीही अतिशय धक्कादायकच होती. 

माझं फार कौतुक वाटायचं आत्याला. ही गोष्ट मला आत्याच्या बोलण्यातून नेहमी जाणवायची. मी घेतलेल्या शिक्षणाचं व माझ्या दिसण्याचं आत्या फार मनातून कौतुक करायची. "किरण दिसायला बखळ चांगला आहे पण बायको कशी भेटते की" म्हणून माझ्यासोबत अनेकदा विनोद करायची. हे मला अनेकदा त्यांनी बोलून दाखवलं होतं. दुसरी गोष्ट नांदेडमध्ये असून किरण घराकडे कधी येत नाहीस म्हणून अनेकदा मला रागवायची. " इथल्या इथं असून येतच नाहीस बापा" अशा शब्दांत बोलायची. आत्याचं हेच प्रेम माझ्या मनावर इतरांपेक्षा एक वेगळी व प्रेमळ छाप सोडून जातं "घरी यायचं किरण, घरी येत जात राहील्याने ओळखीपाळखी राहतात, आमच्या माघारी उद्या तुम्हीच एकमेकांचे सोबती राहणार आहात" असं आत्या म्हणायची. 

गावाकडची अगदी मनातून कौतुकाने विचारपूस करायची. "तिरमुक अण्णा लय दिवस झालं आलाच नाही बघ. त्यानं आला की लय करमते" म्हणायची. आम्ही जेव्हा लहान लहान होतो मी, सुभाष, शिलरत्न, सुरेखा तेव्हा तिरमुक अण्णा आम्हाला काही दिवस सांभाळायला होता असं म्हणायची. "तिरमुक अण्णाचं बोलणं आम्हाला खूप आवडतं असं म्हणायची" अण्णाच्ं बोलणं ऐकून हसून हसून पोटं दुखायचे असं म्हणायची" पुर्वी फार गरिबी भोगली रे आम्ही किरण, नंतर नंतर परिस्थिती सुधारली असं आत्या सांगायची. म्हणून माणसाची परिस्थिती एक सारखी कधीच राहत नसते, ती नक्कीच सुधारते. तुला सुद्धा शिक्षणाच्या बाबतीत कोणीच सांगायला, मार्गदर्शन करायला नसताना तू शिक्षण घेतलास याचाच आम्हाला आनंद आहे किरण. एक ना एक दिवस तुझं पण चांगलं होईल म्हणायची. असं फार चांगलं बोलायची. घरी गेलं की हजार-पाचशे रूपये राहु दे तुला चॉकलेटला म्हणून खिशात घालायची. हजार-पाचशे रूपयांचं आमच्या आत्याला काहीच वाटायचं नाही. 

जसं नाव "विजयालक्ष्मी" होतं तसचं नावाप्रमाणे आदर्श वागणं व उदार अंतःकरण होतं. हा दुर्मिळ योगायोग फार कमी लोकांच्या बाबतीत आढळतो. अनेक माणसांचं त्याच्या नावाप्रमाणे वर्तन कधीच नसतं. नाव एक आणि वागणं अगदी नावाच्या विपरीत असतं. नावं अगदी मोठमोठी परंतु वागणं अगदी संकुचित असतात. बोलण्यात आत्मीयता नसते, अंगी माणुसकी नसते, माणसापरत वेगळं वागणं, मनामध्ये प्रचंड अहंकार (Ego, Attitude) अशाप्रकारचे अनेक लोक असतात. परंतु आमची आत्या यास अपवाद होती.

 'विजयालक्ष्मी' नावाप्रमाणे वागणेही तसेच. ओठांवर एक अन् पोटात दुसरेच असं आत्याच्या स्वभावात अजिबात नव्हतं. जे बोलायची ते स्पष्टपणे बोलायची. अतिशय प्रांजळ मन होतं आत्याचं. घरी माणुस आलं की आत्यानं नाकडोळे मोडले असं कधीच झालं नाही. फार आपुलकीने बोलायची आत्या हे त्यांच्या देहबोलीतून ( Body language) स्पष्ट जाणवायचं. एवढी त्यांची सकारात्मक देहबोली असायची. म्हणून मी सुद्धा नांदेडमध्ये इतर कोणत्याच नातेवाईकाकडे जायचो नाही फक्त आत्याच्या घरी अधूनमधूनच का असेना आवर्जून जात असे. कारण जिथं प्रेम व माणसाची आपुलकी असते तिथच माणूस जातो.

म्हणून राजूदादांनी मला जेव्हा आत्याच्या दुःखद निधनाची बातमी सांगितली तेव्हा मला आत्या सोबतचे हे वर सांगितलेले सर्व अविस्मरणीय क्षण, त्यांचा मला लाभलेला सहवास माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेला. तो आजही जशास तसा आठवतो. म्हणून त्यांच्या निधनाची बातमी ऐकल्याबरोबर मी अगोदर गुरु गोविंदसिंग शासकीय दवाखाना गाठला. जिथं आत्याला अडमिट केलं होतं. तेव्हा शहरात कोरोनाचे अतिशय कडक निर्बंध होते. देशात सर्वत्र कलम 144 लागू होतं. म्हणून जमावबंदी होती. अंत्ययात्रेला सुद्धा अगदी कमी लोकांना परवानगी होती. कोरोनाची दुसरी लाट होती. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट ही अत्यंत विनाशकारी होती. म्हणून प्रशासनाकडून याबाबतची खबरदारी घेतली जायची. या सर्व परिस्थितीमुळे लोक बाहेर निघायला सुद्धा घाबरायची. म्हणून तेव्हा माझ्या घरमालकाने आम्हाला सक्त ताकीद दिली होती की, घराबाहेर कोणी जायचं नाही आणि कोरोनाचा संसर्ग घरी घेऊन यायचा नाही. कोणी घराबाहेर गेल्यास त्यांना रूम सोडावी लागेल. असं आम्हाला आमच्या घरमालकाने सांगितलं होतं. परंतु आत्याचं जाणे हे माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक होतं आणि त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी व अखेरचा चेहरा बघण्यासाठी जाणे हे माझं कर्तव्यच होतं. म्हणून घरमालकाचं म्हणणे डावलून मी थेट शासकीय दवाखाना गाठला. 

तिथ जाईपर्यंत आत्याच्या निधनाची बातमी खोटीच वाटत होती. पण जसेही मी तिथे पोहोचलो तिथे सर्वांना रडत असलेलं पाहून आणखी धक्काच बसला. तिथे सर्वजण कमळ आई, सुरेखा आक्का, सुरेशमामा, सुभाष काका, सुजाता काकू, शिलरत्न काका, शिल्पा काकू, छोटी आक्का, पिंकी आक्का, समा आक्का, बबलू दादा, प्रज्ञा ताई, टिंकु, बंटी, हे सर्वजण दवाखान्यात रडत होते. त्यांना पाहून मग पुर्ण खात्री झाली की आत्या आम्हाला सोडून गेली. ते चित्र आजही मनाला प्रचंड वेदना देतं‌. हे लिहिताना सुद्धा अंगावर शहारे येत आहेत...निशब्द..!

खरंतर आमच्या आत्याला आम्ही आमच्या हातानं गमावल्यासारखं वाटणं स्वाभाविक/ साहजिक आहे. परंतु हे पुर्णतः खरं नाही. कारण कोणताही माणूस आपल्या जीवलग माणसाला आजार झाल्यानंतर दवाखान्यात चांगल्या हेतूनेच दाखल करतो. आपली व्यक्ती ही आजारातून चांगली व्हावी हा त्यामागचा चांगला हेतू असतो‌. परंतु दाखल केल्यानंतर पुढे काय होईल हे कोणालाही सांगता येत नाही आणि त्यात कोरोनाच्या अतिशय भीषण व प्रतिकूल परिस्थितीत तर कोणत्याही दवाखान्यात पेशंटला चांगली ट्रिटमेंट मिळेल याची खात्री नव्हती. त्यातल्या त्यात दुर्दैवाने आत्याला सरकारी दवाखानाच मिळाला. तिथल्या ढिसाळ नियोजनामुळे आमच्या आत्याला आम्हाला कायमचं गमवावं लागलं. तिथे आत्याला कोणतीच सेवा वेळेवर मिळाली नाही. त्यात आमच्या आत्याला स्वच्छतेची फारच सवय आणि आवड होती. स्वच्छतेचा आणि सरकारी दवाखान्याचा दुरदुरवर संबंध नाही हे आपल्याकडचे दवाखाने स्पष्टपणे दर्शवतात. त्यातल्या त्यात जनतेमध्ये कोरोनाविषयी प्रचंड भीती आणि गैरसमजही होते. त्याच्यामुळे कोरोनाकाळात दवाखान्यातील ढिसाळ कारभारामुळे, अस्वच्छतेमुळे, डॉक्टर लोकांमध्ये पेशंटविषयी गांभीर्य नसल्यामुळे, आपल्याही काही अज्ञानामुळे तेव्हा अनेकांचे नाहक बळी गेले. त्यात आमच्या आत्याला सुद्धा याच कारणामुळे हिरावून घेतलं गेलं.

त्यावेळेस न् घाबरता, मनाचा दृढ निश्चय करून घरच्या घरीच क्वारंटाईन केलं असतं तर आज आत्या आपल्यात राहील्या असत्या. परंतु तेव्हा या गोष्टी कुणाला सुचल्याच नाहीत आणि असं काही घडेल असं देखील कुणाला वाटलं नाही. त्यावेळेस जे जे लोक घरी क्वारंटाईन झाली ते ते लोक वाचली. ही सत्यता आपल्याला नाकारता येत नाही. परंतु तसे असले तरी आपणही अतिशय चांगल्या हेतूनेच आपल्या आईला दवाखान्यात अडमिट केलं होतं. म्हणून स्वतःच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करून घेऊ नये. शेवटी नियतीच्या पुढे कुणाचं काही चालत नाही म्हणतात ते काही अंशी का असेना पण खरं आहे. पण काही का असेना आत्याच्या निधनाने फार मोठी हानी झाली आहे. ती कधीही भरून निघू शकणार नाही. 

"मृत्यूसारखी हानी नाही" अशी आपल्याकडे एक म्हण आहे. त्याची प्रचिती आत्याच्या जाण्याने आली. मृत्यूमुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक सर्वप्रकारची जबरदस्त हानी होते. आर्थिक हानीतून माणुस स्वतःला सावरु शकतो परंतु मानसिक खच्चीकरण झालेल्या हानीतून माणुस लवकर सावरू शकत नाही. त्याचे दीर्घकालीन परिणाम माणसाला भोगावे लागतात. याचं गोष्टीचं आम्हा सर्वांना अतीव दुःख आहे आत्या. काही का असेना परंतु तुझं जाणं सर्वांसाठी अतिशय दुःखदायक ठरलं. ते म्हणतात ना "लाख मेले तर चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे". ते अगदी खरंच आहे. "विजयालक्ष्मी" म्हणजे आम्हा पाच-सहा घरांचा पोशिंदाच होता, एक प्रमुख आधारस्तंभ होता. तो आधारस्तंभ कायमचा निखळला त्याचच दुःख आहे.

बाकी तुम्ही गेल्यानंतर सर्व गोष्टी चांगल्याच झाल्या. विशेषत तुझा आवडत्या टिंकूचं (मिलिंद आनंदराव भेदेकर') लग्न फार मोठ्या थाटामाटात झालं. अगदी तुझ्या इच्छेप्रमाणे लग्नही झालं आणि तशी सूनही मिळाली आत्या. दुःख फक्त तुमच्या जाण्याचं आहे. लग्नात तुमचा भव्यदिव्य फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. असं वाटतं होतं की, स्टेजवर बसून तुम्ही लग्न सोहळा डोळ्यात भरत आहात व नववधूस आणि वरास भरभरून आशिर्वाद देत आहात.

कारण लग्नच तसं मोठ्या थाटामाटात साजरं झालं. त्या लग्नाच्या यशस्वीतेसाठी आमचे मामा आयु. आनंदराव चांदोबा भेदेकर' आमचे काका सुभाष चावरे, शिलरत्न चावरे, सुरेश वाघमारे मामा, बबलू अण्णा, शिलवृत जोंधळे, सिद्धार्थ शिराढोणकर भावोजी, सतिश ढवळे भावोजी, सुरेखा आका, संगीता आका (छोटी आका), आम्रपाली आका, समा आका, वैशाली आका, बंटी इत्यादी या सर्वांनी अतिशय कष्ट घेतले व लग्न नियोजनपूर्वक यशस्वी पार पाडले. लग्न सोहळ्याची शोभा बच्चे कंपनीने फार मोठ्या प्रमाणात वाढविली. त्यात बंटी (सुमेध) सुरेश वाघमारे, बंटी चिंतोरे, रोहीणी, फ्रुटी,सुप्रिया, प्रेम, सुमो, सम्राट, प्रितम, चिकू, बदक, गुडीया, खुशी, तुझी आवडती शुभ्रा, रिंका या सर्व बच्चे कंपनीने लग्नाला एक आगळीवेगळी रौनक आणली होती. 

लग्नाची मिरवणूक तर इतकी भव्यदिव्य होती की, जणू बाबासाहेबांच्या जयंतीची मिरवणूकच वाटली. वामनराव पावडे मंगलकार्यालयापासून ते छत्रपती चौक, मोर चौक, समता नगर ते थेट आपल्या घरापर्यंत ही मिरवणूक नाचत गाजत आली. हे सर्व आनंदाचे क्षण पाहायला तू हवी होतीस आत्या असंच त्यादिवशी मनोमन वाटत होतं. फक्त तूझीच कमी जाणवत होती व ती आजन्म जाणवणारच आहे.
बाकी तुझ्या अंगी असलेली माणुसकी, तुझे विचार, संस्कार, आदर्श, चांगले गुण जसेच्या तसे तुझ्या चारही लेकरात व दोन्ही सुनामध्ये आलेले आहेत. बबलू अण्णा व पत्नी प्रज्ञा ताई, टिंकू व पत्नी प्रियाताई या सर्वांमध्ये तुझेच संस्कार व माणुसकीचे गुण आहेत. घरी आलेल्या माणसाला चहा, पाणी, जेवन हे आदरातिथ्य केल्याशिवाय ते कुणालाही घरून येऊ देत नाहीत. घरी गेलं की रहा म्हणून, जेवन करून जा म्हणून आपुलकीने विनवणी करणे हे तुझे संस्कार जन्मतः त्यांच्यात निर्माण झाले आहेत. म्हणून तुझ्या हयातीत सुद्धा परिवार आदर्शवतच होता व तुझ्या पश्चातही तुझी लेकरं तो आदर्शच ठेवतील यात मला मुळीच शंका नाही.

तुला जशी माणसांची आपुलकी होती तशीच घरात सर्वांना आहे. मला आजही आठवते आत्या मी जेव्हा एल.एल.बी पास झालो होतो तेव्हा माझा तू आणि बबलू दादाने मिठाई, फुलांचे गुच्छ आणुन स्वताच्या हाताने मला मिठाई भरवून खूप चांगला सत्कार केली होतीस. "वकीली करत करत सरकारी नोकरीचे सुद्धा प्रयत्न करत जा किरण असंही म्हटली होतीस नोकरी लागल्यावर तुझा आणखी मोठा सत्कार करू".असं तू नेहमीच म्हणायचीस आत्या. तुझे शब्द न् शब्द आजही मला जशास तसे आठवतात.

तुझ्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त या सर्व आठवणी माझ्या लेखणीतून उतरविताना माझाच गळा दाटून येत आहे. कारण तुलाच फार कमी आयुष्य लाभलं. 15.05.1965 चा तुझा जन्म आणि 14.04.2021 ला तुझं निर्वाण. म्हणजे एकूण 56 वर्षांचं आयुष्य तुला लाभलं. हे आयुष्य अजून जास्त मिळायला हवं होतं. माझे बाबा आजही नेहमी म्हणतात की, विजयाबाई, सुभाष, शिलरत्न, सुरेखाबाई माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहेत किरण. लहानपणी मी त्यांना सर्वांना सांभाळलय, त्या सर्वांना कडेवर उचलून घेतलोय. परंतु विजयाबाई अशी अचानक जायला नको होती. असं बाबा आजही आत्याची आठवण काढून म्हणतात.

आत्याच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण सर्वांनी त्यांच्या अचानक झालेल्या दु:खद निधनातून व कोरोना सारख्या भयंकर महामारीतून आपण एक गोष्ट नक्कीच शिकावयास हवी असे मला वाटते. ती गोष्ट म्हणजे, माणसाने माणसाला केंद्रस्थानी ठेवून नाते निभावले पाहिजेत. माणसांचं आयुष्य हे फार मर्यादित आहे. ऐनवेळी पैसा, धन, दौलत, संपत्ती काहीच कामावर पडत नाही. केवळ पैसा हेच सर्वस्व नाही ही गोष्ट आपल्याला कोरोनाने शिकवली. पैशाने सर्वकाही करता आलं असतं तर आज आई आपल्यात राहील्या असत्या. ऐनवेळी काहीच हाती लागत नाही. कोण केव्हा जाईल आणि कुणाची भेट ही अंतिम भेट ठरेल याची कसलीच शाश्वती नाही. प्रत्येक माणसाला सुख आणि दुःख समान असतात. उलट सुखापेक्षा दुःखाचं पारडच जास्त जड असतं. 

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अडीअडचणी असतात. अडीअडचणी शिवाय, संकटाशिवाय जीवन नाही. ही अटळ अशी गोष्ट आहे. जगातला कोणतीच व्यक्ती सर्वगुणसंपन्न (Perfect) नाही. प्रत्येकजण अपुर्ण आहे. जीवन जगत असताना प्रत्येकाकडून चुका होतात. कारण मुळात माणूस हा परफेक्ट नाही. तो जन्मापासून मृत्यूपर्यंत अपुर्ण/ अपरिपुर्णच असतो. म्हणून माणसांकडून चुका होणे स्वाभाविक आहे. चुका झाल्या म्हणून नात्याला दूर करायचं नसतं. कारण एकदा मृत्यू झाला की माणूस कधीच आपल्याला भेटत नाही. हे शाश्वत सत्य आहे. 

प्रत्येक माणसात काही चांगले तर काही वाईट गुण असतात. म्हणून आपल्या माणसाला त्याच्या गुणा-दोषासहीत स्विकारायचं असतं. दुसऱ्यांच्या चुका बघताना कधी आपल्याही चुका बघायच्या असतात. माणसाच्या चुका, त्यांचा रंग रूप, त्याचा पैसा, श्रीमंती, धन, संपत्ती, अहंकार, अभिमान, द्वेष, मत्सर या कोणत्याच गोष्टी मरताना सोबत येत नाहीत. सोबत फक्त माणसाचे चांगले गुण व त्यांचे चांगले कर्म येत असतात. चांगल्या कर्मामुळेच माणुस त्याच्या किर्तीरुपाने, चांगल्या आठवणीने आपल्या हृदयात जीवंत राहतो. जसं आत्याच्या चांगल्या वागण्याने, उदार अंतःकरणाने, सर्वांना लावलेल्या जीवामुळे, त्यांच्यातील माणुसकीमुळे आत्या आजही आपल्यात व माझ्या लेखणीत त्या जीवंत आहेत.

याच गोष्टी आपल्याला कोरोनाने शिकवल्यात. या गोष्टीचा विचार करून आपण आपल्या जीवनाची पुढील वाटचाल केली पाहिजे. तरच आत्यांना खरी आदरांजली व खरे अभिवादन ठरेल. पुनश्च एकदा सर्वातर्फे आत्याला द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त अतिशय जड अंतःकरणाने विनम्र श्रद्धांजली वाहतो. आत्या तुझ्या आत्म्यास चिरंतन शांती लाभो. हीच तथागत बुद्धाच्या चरणी प्रार्थना करतो.

बुद्धंम नमामी..!
धम्मंम नमामी..!!
संघम नमामी...!!!

आत्या तुझाच
-किरण 

-किरण त्र्यंबक चावरे
मो. 9309770054- 7058478827

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा